SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे : किरीट सोमय्या

schedule06 Jul 26 person by visibility 354 categoryराजकीय

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रनायक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. मुखर्जी यांच्या जीवनचरित्रावरील विशेष प्रदर्शनीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते  किरीट सोमय्या, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर, पृथ्वीराज पाटील, राहुल चिकोडे, अमर साठे, विराज चिखलीकर, सुशीला पाटील, डॉ. आनंद गुरव, रमा पाठक, माधुरी नकाते, विश्वजित पवार, रवीश पाटील यांच्यासह भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना  किरीट सोमय्या म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच काश्मीरच्या संपूर्ण एकात्मतेचा विचार देशभर जिवंत राहिला. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात "जहाँ हुए मुखर्जी बलिदान, वो कश्मीर हमारा है" हा घोष सातत्याने दिला जात होता. कलम ३७० हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डॉ. मुखर्जी यांच्या बलिदानाला न्याय दिला. आज जम्मू-काश्मीर विकासाच्या नव्या वाटेवर असून येत्या काळात प्रत्येक काश्मीरी अभिमानाने "हम हिंदुस्तानी हैं" असे म्हणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची स्थापना भारतीय संस्कृती, हिंदुत्व आणि राष्ट्रीय स्वाभिमान या विचारांवर झाली आहे. वंदे मातरम्‌ला पुन्हा योग्य सन्मान मिळवून देण्यापासून ते राष्ट्रहिताच्या विविध निर्णयांपर्यंत भाजपाने सातत्याने राष्ट्र प्रथम ही भूमिका घेतली आहे. देशाच्या पुनर्निर्माणासाठी आणि विकसित भारताच्या संकल्पनेसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पित भावनेने कार्य करणे आवश्यक आहे.

मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR) मोहिमेबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, मतदार यादी शुद्ध, पारदर्शक आणि अचूक ठेवणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे आणि प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन मतदार पडताळणीचे काम जबाबदारीने पूर्ण करावे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून कार्यकर्त्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि अखंड भारताच्या ध्येयासाठी समर्पित होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, पश्चिम बंगाल भारतात कायम राहण्यासाठी त्यांनी बजावलेली भूमिका, निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी केलेले प्रयत्न, तसेच केंद्रीय मंत्री म्हणून देशाच्या पहिल्या औद्योगिक धोरणातील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी आहे. "एक देशात दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण चालणार नाही" या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले, असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी विराज चिखलीकर, राहुल चिकोडे, हेमंत आराध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर साठे यांनी केले.

याचप्रसंगी भाजपा जिल्हा कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनचरित्रावरील विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनीत त्यांच्या बालपणापासून शिक्षण, सार्वजनिक जीवन, राष्ट्रहितासाठी केलेले संघर्ष, भारतीय जनसंघाची स्थापना, अखंड भारतासाठीचे योगदान आणि सर्वोच्च बलिदान यांचा छायाचित्रे व माहितीच्या माध्यमातून सविस्तर आढावा मांडण्यात आला.

याप्रसंगी भाजपा लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id