कोल्हापूर महापालिकेतील 'या' नगरसेवकांचे पद धोक्यात; जातीचा दाखला अवैध ठरल्याने खळबळ
schedule29 Jun 26 person by visibility 444 categoryराजकीय
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय उर्फ रिंकू देसाई यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याने त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रिंकू देसाई हे प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपच्या वतीने निवडून आले होते. मात्र, त्यांनी 'कुणबी' या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. आज, जात पडताळणी कार्यालयाने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला आहे. यामुळे त्यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांचे नगरसेवक पद आता धोक्यात आले आहे.
या संदर्भात रिंकू देसाई हे या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे समजते. मात्र, या निर्णयामुळे कोल्हापूर महापालिकेतील भाजपला मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, केवळ देसाईच नव्हे, तर अजूनही अनेक नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.