SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

समूहभावाचे खेड्याचे जीवनतत्व भंगल्यानेच सामाजिक प्रश्र्न वाढले : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस

schedule31 Jan 26 person by visibility 393 categoryसामाजिक

▪️ विश्वास पाटील यांच्या 'फेरा जन्म मृत्यूचा' पुस्तकाचे शानदार  सोहळ्यात प्रकाशन

कोल्हापूर : समूहभाव आणि सहानुभाव हे खेड्याचे जीवनतत्व आहे. निसर्गाचे सानिध्य असेल तर गाव आहे. पण आता खेड्यात जन्माला आलेला नवीन मध्यमवर्ग संवेदनशून्य आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

येथील शाहू स्मारक भवन येथे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास सावित्री शामराव पाटील यांनी लिहिलेल्या 'फेरा जन्म मृत्यूचा' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गवस यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले अध्यक्षस्थानी होते. लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, प्रकाशक भाग्यश्री पाटील, साताऱ्याच्या महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील प्रमुख उपस्थित होत्या. 

 एखाद्या प्रकाशन सोहळ्याला समाजातील इतके चांगले लोक उपस्थित राहतात हे लेखक विश्वास पाटील यांच्या समाजशील पत्रकारितेचे फलित असल्याचे राजन गवस यांनी सांगितले.
डॉ. गवस म्हणाले, 'इंग्रजांच्या काळात अक्षर म्हणजे ज्ञान अशा शिक्षणाचा प्रसार झाला. त्यातून गावगाड्याचे जीवन बहिष्कृत झाले. चांगले-वाईट हे त्या त्या गावावरुन समजले जाते, ते त्या गावचा समूहभाव आहे. या जोरावरच खेडं उभे राहिले, पण त्यांच्याकडे अडाणी म्हणून पाहू लागलो. ग्रामीण माणूस आजपर्यंत गायी-म्हैशी, कुत्रे, मांजर अशा सगळ्यांना सोबत घेवून जगत आला आहे. गाव एक समूह आहे आणि पशु-पक्षी जगली पाहिजेत, जंगली वाचली पाहिजेत. तरच जगण्याला अर्थ आहे. किड्या मुंग्याना जेवढा जगण्याचा अधिकार तेवढाच मलाही अधिकार या सहानुभावावर खेडी उभी राहिली परंतू आता लोकांना कुत्रे-मांजरही नको झाली आहेत आणि आईवडिलही. चंगळवादाकडे झुकलेला व संवेदनाशून्यू असा जो नवमध्यमवर्ग निर्माण झाला, त्यांनी समूहभाव आणि सहानुभावची जबाबदारी नीट पार पाडली नाही. 

या नवमध्यमवर्गाने 'आतला-बाहेरचा' गावगाडाच समजून घेतला नाही. यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले. सध्याची सामाजिक स्थिती, बदलते ग्रामजीवन, आत्मकेंद्रित नव मध्यमवर्ग यावर ऊहापोह करताना ते म्हणाले,' गाव हा एक समूह आहे. जे जे असेल ते गावचे, समूहाचे. या समूहभाव आणि सगळयासहित जगण्याचा सहानुभाव हा ग्रामजीवनाचा, खेडयांचा मूळ स्वभाव आणि मूलतत्व. मात्र आंग्ल संदर्भातील शिक्षणातून जो वर्ग तयार झाला. त्यांनी खेडी किती समजून घेतली ? त्यांना गावगाडा किती समजला. प्रत्येक गावगाडयामध्ये एक गाव आत असतो, एक गाव बाहेर असतो. आतला बाहेरचा हा गावगाडा समजून घ्यायला हवा होता. मात्र नव मध्यमवर्गाने साऱ्यांनाच अंतरावर ठेवले. 

ज्येष्ठ संपादक वसंत भोसले म्हणाले, वाचकांना काय आवडेल हे पाहून वृत्तपत्रात लिहिण्याची पध्दत आली, परंतु समाजात जे बदल घडताहेत ते सांगण्याचा, प्रसंगी त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला, त्याला वाचकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. लाेकशाही बळकट करणे हे माध्यमांची ताकद आहे. जे समाजहिताचं आहे, कसदार आहे. त्याच्या पाठीशी समाजाने उभं राहावे. विश्वास पाटील यांनी समाजहित केंद्रस्थानी ठेवून बंडखोरी वृत्तीने प्रबोधनात्मक लिखाण केले आहे. निश्चितच ते समाजाला उपयुक्त ठरणारे आहे.


पुस्तकामागची भूमिका मांडताना विश्वास पाटील म्हणाले, श्रध्दा ही अंधश्रध्देच्या वाटेवर चालू लागली आहे. पण समाजाचा रेटा वाढला तर समाजात बदल घडू शकतो. कर्मकांड, अंधश्रद्धा, खोटी प्रतिष्ठा यामुळे समाज जीवनावर होणारा परिणाम हा अस्वस्थ करणारा आहे. समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वतः पासून करायला हवी. समाजात शिक्षित, नवमध्यमवर्ग जो तयार झाला आहे तो कर्मकांड व अंधश्रद्धेत गुरफटत आहे. श्रद्धा जरुर असावी, पण अंधश्रद्धा व कर्मकांडाकडे झुकू नये. समाजातील ढोंगीपणा, दांभिकतेवर शाब्दिक प्रहार करताना समाजातील चांगुलपणा, बदलाचे वारे नेमकेपणाने टिपत ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांचेही यावेळी भाषण झाले. प्रकाशक भाग्यश्री पाटील-कासोटे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी आभार मानले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id