कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज
schedule08 Feb 26 person by visibility 203 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर, उद्या सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजल्यापासून सर्व तालुका मुख्यालयी निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण ६८ गट आणि पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी झालेल्या या निवडणुकीत जिल्ह्याचा सरासरी मतदानाचा टक्का ७४.४५ इतका उत्साहवर्धक राहिला आहे.
मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, प्रत्येक तालुक्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर फेरीनिहाय नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक फेरीनंतरचे निकाल लाऊडस्पीकरद्वारे अधिकृतपणे जाहीर केले जातील.
🟠 प्रवेशाबाबत नियम :
मतमोजणी केंद्राच्या परिसरात अनाधिकृत व्यक्तींना प्रवेशास सक्त मनाई आहे. केवळ वैध ओळखपत्र असणारे उमेदवार, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी, निवडणूक प्रक्रियेतील शासकीय कर्मचारी आणि नोंदणीकृत माध्यम प्रतिनिधी यांनाच प्रवेशाची परवानगी असेल.
🟠 सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक आदेश:
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये मतमोजणी परिसरात उद्या सकाळी ७ वाजल्यापासून प्रक्रिया संपेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश असून, या परिघात विनापरवाना लाऊडस्पीकरचा वापर, वाहने थांबवणे किंवा फिरवणे, आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही वर्तन (भाषण, नक्कल, चित्र प्रदर्शन) करण्यास मनाई करण्यात आली आहे.
🔸इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी:
मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात कोणालाही मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगता येणार नाही. तसेच विनापरवानागी मतमोजणी केंद्रात फोटो काढणे किंवा चित्रीकरण करण्यास पूर्णतः बंदी असून गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची शस्त्रे किंवा दारुगोळा बाळगणे हा गुन्हा मानला जाईल. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ नुसार कडक कारवाई केली जाईल.
🔸तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे:
• करवीर: शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कसबा बावडा.
• गगनबावडा: तहसीलदार कार्यालय.
• शाहूवाडी: जुने शासकीय धान्य गोदाम, तहसीलदार कार्यालय.
• पन्हाळा: नगरपरिषद, मयूर बाग हॉल.
• कागल: जवाहर नवोदय विद्यालय.
• राधानगरी: तालुका क्रीडा संकुल, राजर्षी शाहू विद्यामंदिर जवळ.
• आजरा: तहसीलदार कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हॉल.
• भुदरगड: तालुका क्रीडा संकुल, मौनी विद्यापीठ परिसर, गारगोटी.
• शिरोळ: तहसीलदार कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत.
• हातकणंगले: राजीव गांधी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी.
• गडहिंग्लज: पॅव्हेलियन हॉल, गांधीनगर.
• चंदगड: मीटिंग हॉल (ऑडिटोरियम), तहसीलदार कार्यालय.
जिल्हा प्रशासनाने सर्व केंद्रांवर पिण्याचे पाणी, अखंडित विद्युत पुरवठा आणि आपत्कालीन आरोग्य पथके यांची चोख व्यवस्था केली आहे. शांततामय वातावरणात निकाल प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.