दावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तौरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
schedule08 Feb 26 person by visibility 100 categoryराज्य
अहिल्यानगर : दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, यात एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात ११ हजार ५१९ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. याद्वारे १८ हजार रोजगाराची निर्मिती होणार असून उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास ७५ हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सुपा (ता. पारनेर) एमआयडीसी येथे ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशिनाथ दाते, सुरेश धस, विक्रमसिंह पाचपुते, तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भरत गीते व थोनी ॲल्युमिनियमचे लोथर थोनी आदी उपस्थित होते.
इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गुंतवणूक येत असल्याचे नमूद करीत, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तौरल इंडियाचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. स्वतंत्र व आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या वस्तूंची आपल्याला आयात करावी लागते, त्याला सक्षम पर्याय देशातच निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी आता भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भरत गीते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे तयार होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा समतोल राखण्यावर शासनाचा भर आहे. पूर्वी राज्याची औद्योगिक प्रगती केवळ मुंबई, एमएमआर व पुणे या भागांपुरती मर्यादित होती. ती विकेंद्रित करून राज्याच्या सर्व भागांत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सुपा एमआयडीसी हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. केवळ सामंजस्य करार करून न थांबता, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योग विभाग तत्परतेने काम करत आहे. दावोसमध्ये २०२५ मध्ये करण्यात आलेला करार अत्यंत वेगाने प्रत्यक्षात आला आहेत, असेही श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले , दावोसमध्ये झालेले करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरले आहेत, हे राज्यासाठी भूषणावह आहे. एका मराठी उद्योजकाने परदेशी भागीदारांच्या सहकार्याने ५०० कोटींची उलाढाल करणारा उद्योग उभा करणे हे नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. हेलिकॉप्टर, जहाजे आणि रस्ते बांधणीसाठी लागणारे अद्ययावत भाग आता अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
लोथर थोनी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात गीते यांनी तौरल इंडिया प्रकल्पाबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, भगवान गडाचे महंत ह.भ.प. नामदेव शास्त्री, नारायण गडाचे ह.भ.प शिवाजी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर, उद्योजक व नागरिक उपस्थित होते.