अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणी
schedule30 Oct 26 person by visibility 227 categoryआरोग्य
🟣 मोफत आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १३ हजार २९५ वर
अकिवाट : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत अकिवाट येथे आयोजित आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामुळे अभियानातील आज अखेरच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या १३ हजार २९५ वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
अकिवाट येथील शिबिराला अजय पाटील यड्रावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शिबिरातील आरोग्य तपासणीच्या कामकाजाची माहिती घेतली. गावातील नागरिकांना मोफत आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यापूर्वी अभियानांतर्गत १२ हजार ६२८ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला होता. अकिवाट येथील ६६७ लाभार्थ्यांची भर पडल्याने अभियानातील एकूण लाभार्थ्यांची संख्या आता १३ हजार २९५ झाली आहे.
या प्रसंगी ताजोद्दीन तहसीलदार, आप्पासो बडबडे, आप्पासो दानोळे, गणपती कागे, बाळासो नाईक, विशाल आवटी, संजय कोथळी, तानाजी हुजरे, प्रकाश रायनाडे, कुमार रायनाडे, इंद्रजित पाटील, आशिष पाटील, भुपाल रायनाडे, अविनाश रायनाडे, विश्वास कांबळे, अमोल कांबळे, अरुण कल्लण्णावर, जिवंधर दानोळे, जयपाल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.