आमदार सतेज पाटील यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर
schedule29 Oct 26 person by visibility 350 categoryराजकीय
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टिकेला अत्यंत सविस्तरपणे आणि पुराव्यानिशी प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी जातीवाद करून माझ्या मुलाचा पराभव केल्याचा आरोप करण्यात आला होता, यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर हा राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात कधीही असा कुठलाही जातीवाद केला जात नाही. ज्यावेळी गोकुळ मध्ये नविद मुश्रीफ यांना चेअरमन करायचे होते त्यावेळी त्यांच्या नावाचे पाकीट आपणच दिले होते. त्यावेळी तुम्हाला जातीवाद आठवला नाही का? असा सवाल करत मंत्री मुश्रीफ यांनी ज्यांच्यावर प्रत्यक्षात बोलायला हवे होते, त्यांच्याऐवजी दुसऱ्याच मुद्द्यांवर बोलणे पसंत केले, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
या पत्रकार परिषदेमध्ये सतेज पाटील यांनी निवडणुकीतील मतांची सविस्तर आकडेवारी व तुलनात्मक माहिती उपस्थितांसमोर मांडली. ते म्हणाले की, सर्वसाधारण गटामध्ये महायुतीच्या पॅनेलला ५०.८ टक्के मते मिळाली, तर नविद मुश्रीफांना ४५.३ टक्के मते मिळाली आहेत.
पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, राधानगरी, भुदरगड आणि गडहिंग्लज या सर्वच प्रमुख तालुक्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये विरोधकांची व त्यांच्या पॅनेलची मते कशी कमी पडली, याची सविस्तर आकडेवारी त्यांनी यावेळी सांगितली. बहुतांश ठिकाणी विरोधकांच्या पॅनेलला व उमेदवारांना मिळालेली मते कमी झाल्याचे दिसून आले असून, ही मते नेमकी कुणाच्या विरोधात गेली आणि कोणामुळे कमी पडली, याचे आत्मपरीक्षण मंत्री हसन मुश्रीफ करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.